पावसाळा उन्हाळ्यातील उष्णतेपासून दिलासा देतो म्हणून आपोआपच मन प्रसन्न होते आणि निसर्गाचे सौंदर्य खुलते म्हणून पर्यंटनाचा आनंद घेता येतो. ह्या आनंददायी वातावरणासोबतच हा ऋतु आरोग्यासंबंधी आव्हाने घेऊन येतो. विशेषतः. वाढलेली आर्द्रता, सतत बदलणारे तापमान, अस्वच्छ पाणी, डास व किटकांचा वाढता प्रादुर्भाव, आणि वाढते संसर्ग यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
पावसामुळे सगळीकडे चिखल होतो, भरपूर पाऊस झाला तर सगळीकडच्या नद्या, ओढे, नाले यांना पुर येतो ज्यामुळे खराब पाणी संपूर्ण परिसरात साचते. ह्या पाण्यासोबत वाहून आलेली घाण तशीच साचुन राहते ज्यामुळे डास व अस्वच्छता वाढते. बऱ्याचवेळा पिण्याच्या पाण्यात सुद्धा घाण पाणी मिसळून विविध आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते. सगळीकडे दमट आणि ओलसर असल्यामुळे बऱ्याचदा त्वचेच्या समस्या सुद्धा होतात.
पावसाळ्यात तुम्ही निरोगी राहण्यासाठी चांगला आहार घेणे, आरोग्य जपणे आणि प्रतिकारशक्ती वाढवणे जास्त महत्वाचे ठरते. ह्या ब्लॉगमध्ये आपण पावसाळ्यात आजारी पडू नये म्हणून कुठली काळजी घ्यावी हयाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
वैयक्तिक स्वच्छता राखा
- हात नियमितपणे धुवा: कोणत्याही किटाणू पासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुवा त्यासाठी साबण, हँडवॉश, गरम पाणी वापरा. विशेषत: जेवण करण्यापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर आवश्य हात धुवा.
- नियमित आंघोळ करा: शरीरावरील घाम व आर्द्रतेने झालेला चिकटपणा काढून टाकण्यासाठी आणि बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी दिवसातून किमान एकदा तरी गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करणे गरजेचे आहे.
- पाय कोरडे ठेवा: पाय सतत ओलसर राहिल्याने खाज सुटणे, बोटांमध्ये जखम होणे, पांढरे फोड येणे, पायांना भेगा पडणे, आणि पायांची जळजळ होणे असे त्रास शकतो भिजल्यानंतर पाय स्वच्छ कोरडे करा.
- पूर्ण सुकलेले कपडे घाला: पावसाळ्यात कपडे पूर्णपणे कोरडे होत नाहीत आणि ओलसर कपडे घातल्याने त्वचेवर बुरशी वाढते ज्यामुळे खाज येणे, त्वचा लाल होणे, अंगावर चट्टे दिसणे आणि पुरळ येणे असे त्रास होऊ शकतात. तसेच पावसाळ्यात खरूज, इसब यांसारखे आजार देखील होऊ शकतात.
डासांपासून संरक्षण करा
पावसाळा हा डासांच्या उत्पत्तीचा काळ असतो म्हणून भरपूर प्रमाणात डास होतात ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया, झिका आणि चिकनगुनियासारखे आजार होतात. डास व इतर किटकांपासून वाचण्यासाठी काय करावे ते बघूया:
1)मच्छर प्रतिबंधके(मॉस्किटो रिपेलेंट्स) वापरा: घरात जास्त डास झाल्यास किंवा बाहेर जाताना त्वचेवर योग्य प्रतिबंधके लावा आणि झोपताना मच्छरदाणी वापरा ज्यामुळे डास चावण्याचा धोका कमी होतो.
2)पाणी साचू देऊ नका: तुमच्या घरात किंवा सभोवताली डास वाढतील असे पाणी साचत असेल तर ते त्वरित स्वच्छ करा.
3)स्वतःचा बचाव करा: अंग पूर्ण झाकले जाईल असे पूर्ण कपडे घाला ज्यामुळे डास चावत नाहीत व कुठलाही आजार होत नाही.
4)कीटकनाशक फवारणी करा: ह्या फवारणीमुळे डास आणि बरेचसे कीटक कमी होतात ज्यामुळे आजारांचा धोका कमी होतो.

तुमचा परिसर स्वच्छ ठेवा
स्वच्छ आणि मोकळा परिसर असल्याने पावसाळ्यात होण्याचा रोगांचा धोका कमी होतो.
1)घरात योग्य वायुवीजन (व्हेंटीलेशन) आर्द्रता कमी करण्यास मदत करते ज्यामुळे बुरशी आणि दमटपणा देखील होत नाही.
2)कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा: माश्या, कीटक आणि उंदीर टाळण्यासाठी कचऱ्याची नियमितपणे योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
3)घर स्वच्छ ठेवा: जंतू, जीवाणू, डास नष्ट करण्यासाठी घर नियमितपणे स्वच्छ करा. घरातील टॉयलेट बाथरूम स्वच्छ आणि कोरडे ठेवा
प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खा
आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे हवामानातील बदलानंतर ऋतुचर्या बदलली पाहिजे , यात आहार, विहार यात प्रकर्षाने बदल होतो. आयुर्वेदिक दिनचर्या पावसाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी उत्तम मार्ग आहे. रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात ते बघूया:
- व्हिटॅमिन सी-युक्त पदार्थ खा: संत्री, लिंबू आणि आवळा ही फळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यांचा आहारात समावेश करून घ्या.
- हळद, लसूण, आलं, जेष्ठमध यांचे सेवन करा. तुम्ही वेगवेगळे काढे करून पिऊ शकता किंवा चहा मध्ये घालून त्यांचे सेवन करू शकता.
- सुका मेवा म्हणजे भरपूर जीवनसत्त्वे असलेला स्त्रोत जो आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात .
- हंगामी फळे आणि भाज्या खा: पावसाळ्यात अनेक पालेभाज्या येतात ज्या आरोग्याला पोषक असतात तसेच अनेक हंगामी फळे बाजारात येतात ते खाणे फायद्याचे ठरते कारण ही फळे व भाज्या संक्रमणाशी लढण्यासाठी शरीराला अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे पोहचवतात. परंतु पालेभाज्या व फळे व्यवस्थित स्वच्छ करणे महत्वाचे ठरते कारण पावसाळ्यात फक्त चिखलच नाही तर इतर जिवाणू सुद्धा भाज्यांवर असू शकतात.
बाहेरील खाद्यपदार्थ टाळा
- घरी बनलेले अन्न खा: पावसाळ्यात नेहमी सकस, हलका, अधिक सुरक्षित आणि पौष्टिक आहार निवडावा म्हणून बाहेरील अन्न खाणे टाळावे.
- उकळलेले पाणी प्या: पावसाळ्यात अशुद्ध पाण्याने होणारे त्रास टाळण्यासाठी फिल्टर केलेले किंवा उकळलेले पाणीच प्या. ह्यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास होणार नाहीत.
- कच्चे पदार्थ खाऊ नका: इतर सीजन मध्ये खातो तसे पावसाळ्यात कच्च्या भाज्या, त्यापासून बनलेले सॅलड किंवा इतर पदार्थ खाऊ नका. बऱ्याचवेळा त्यात घातक ठरणारे कीटक असतात त्यामुळे भाज्या आणि फळे मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून मग खा.
भरपूर पाणी प्या
पावसाळ्यातही शरीरात योग्य पाण्याची पातळी राहणे आवश्यक आहे पण ह्या सीजनमध्ये फक्त पाणी पिऊन सजलीकरण (हायड्रेशन) राखण्यापेक्षा इतर ऊर्जा देणारे पेय पिऊन हायड्रेट राहिले पाहिजे.
1)थंड पेय टाळा: सजल राहण्यासाठी जर तुम्ही कुठलेही गार पेय पित असाल तर त्याचा शरीराला त्रास होऊ शकतो म्हणून दुसरे आयुर्वेदिक फायदे असणारे काढे व पेय घ्या.
2)भरपूर पाणी प्या: दिवसातून किमान 8 ग्लास तरी पाणी पिले पाहिजे.
3)आले, तुळशी आणि इतर मसाले घालून चहा घ्या जे पचन आणि प्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर ठरू शकतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला झाल्यास काढा करून प्या.
पावसाळ्यातील सामान्य आजार आणि प्रतिबंध
पावसाळ्यात अनेक आरोग्य समस्या जाणवतात त्यातून काही सौम्य असणारे त्रास घरगुती ईलाजाने बरे होतात पण काही गंभीर त्रासांसाठी मात्र वैद्यकीय मदत घेतलीच पाहिजे. पावसाळ्यात कुठले सामान्य आजार होऊ शकतात आणि ते कसे टाळायचे ते बघूया.
1) संक्रमण टाळा व त्यापासून बचाव करा: तुम्हाला सर्दी किंवा खोकला असल्यास त्याचा इतरांना त्रास होऊ नये म्हणून मास्क वापरा आणि संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
2)डेंग्यू, झिका आणि मलेरिया: हे आजार संक्रमित डास चावल्याने होतात म्हणून डासांपासून स्वतःचे संरक्षण केले पाहिजे.
3)पोटात आणि आतड्यांमध्ये रोगसंक्रमण : ह्या समस्या पावसाळ्यात सामान्य आहेत परंतु त्यांचे परिणाम काही वेळा गंभीर असू शकतात म्हणून योग्य स्वच्छता पाळा, बाहेरील दूषित किंवा तेलकट अन्न खाणे टाळा तसेच शक्य असल्यास घरचे पाणी सोबत ठेवा.
सारांश
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, पौष्टिक आहार, स्वच्छ वातावरण ई. पाळणे अत्यावश्यक ठरते. वरील काही काळजी घेतल्याने तुम्ही सामान्य आजारांना बळी न पडता पावसाळ्याचा आनंद लुटू शकता. नेहमीच उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला असतो म्हणूनच जीवनशैलीतील काही सामान्य बदल पावसाळ्यात तब्येत चांगली ठेवण्यासाठी मदत करू शकतात.
प्रश्नोत्तरे
पावसाळ्यात खाण्यापिण्याच्या कुठल्या सवयी टाळल्या पाहिजेत?
पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाणे टाळावे तसेच अंबवलेले पदार्थ, बेकरीतील खाद्यपदार्थ, मसालेदार, बाहेरील खाद्यपदार्थ, व शिळे अन्न खाणे टाळावे. फ्रीजमधील अतिथंड पाणी, आइसक्रीम, कोल्ड ड्रिंक्स यांसारखे पेय टाळावेत.
पावसाळ्यात आजारपणापासून वाचण्यासाठी कुठले आयुर्वेदिक उपाय केले पाहिजे?
रोज दूध हळद पिणे अत्यंत गुणकारी मानले जाते तसेच दूध, हळद, तुळशीची पाने, आणि सुंठ एकत्र उकळून ते पिणे देखील निरोगी राहण्यासाठी फायद्याचे ठरते. झोपताना कोमट पाणी पिल्याने घशातील खवखव कमी होऊ शकते. असे आयुर्वेदातील सोपे उपाय केल्याने पावसाळ्यात तुम्ही निरोगी राहू शकता.