डासांमुळे होणाऱ्या रोगांमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि झिका हे सर्वात सामान्य आजार आहेत. त्यातून बरे होण्यासाठी प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन आणि प्रतिबंध करणे आवश्यक ठरते पण त्यासाठी त्यांची लक्षणे आणि मूलभूत उपचारांचे पर्याय समजून घेणे महत्त्वाचे आहे. जरी घरगुती उपचारांचे पर्याय माहिती असले तरी लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार सुरू करणे महत्वाचे आहे. या ब्लॉगमध्ये आपण डेंग्यू, मलेरिया आणि झिका या आजारांची लक्षणे आणि उपचारांविषयी माहिती बघणार आहोत.
1)डेंग्यू
डेंग्यू प्रामुख्याने एडिस या डासांमुळे पसरतो ज्याची लक्षणे सामान्यतः डास चावल्यानंतर 4 ते 10 दिवसांनी दिसतात आणि ही लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात. डेंग्यूमध्ये बऱ्याचवेळा दोन प्रकार दिसून येतात.
सामान्य लक्षणे निदर्शनात येताच उपचार केल्यास कमी त्रासात हा आजार बरा होऊ शकतो परंतु दुर्लक्ष केल्याने गंभीर लक्षणे दिसू शकतात. डेंग्यूचे सामान्य लक्षणे:
- उच्च ताप (40°C/104°F)
- तीव्र डोकेदुखी
- डोळे दुखणे
- मळमळ होणे
- उलट्या होणे
- ग्रंथी सुजणे
- पुरळ येणे
- स्नायू, सांधे किंवा हाडांचे दुखणे
कधीकधी हाडांचे दुखणे खूप असह्य होते म्हणून डेंग्यूला ‘ब्रेकबोन फिव्हर’ असेही म्हणले जाते.
गंभीर डेंग्यूची लक्षणे
जेव्हा रक्तवाहिन्या खराब होतात त्यातून रक्तस्राव होतो आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होते तेव्हा गंभीर डेंग्यू होतो. ह्या डेंग्यूमुळे हिरड्या किंवा नाकातून रक्तस्त्राव, अंतर्गत रक्तस्त्राव यांसारखे धोके वाढतात. त्यातून अवयव निकामी होऊ शकतात आणि परिणामी मृत्यू देखील होऊ शकतो. गंभीर डेंग्यूची लक्षणे ही असू शकतात:
1)तीव्र ओटीपोटात दुखणे
2)जलद श्वास घेणे
3)सतत उलट्या होणे
4)हिरड्या किंवा नाकातून रक्तस्त्राव होणे
5)थकवा व अस्वस्थता जाणवणे
6)उलटीमधून किंवा मलाद्वारे रक्त जाणे
डेंग्यूवर उपचार
डेंग्यूसाठी कोणताही विशिष्ट विषाणूविरोधी (अँटीव्हायरल) उपचार नाही पण मूलभूत खबरदारी आणि उपचारांसाठी काही उपाय करणे आवश्यक आहे.
- गंभीर परिणाम दिसत असले तर त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल व्हा त्यामुळे वैद्यकीय देखरेखीमध्ये तुम्हाला चांगला उपचार घेता येईल.
- सगळ्यात महत्वाचे म्हणजे डेंग्यू पासून वाचण्यासाठी डासांपासून स्वतःचे संरक्षण करा आणि खबरदारी पाळा.
- खूप ताप येणे आणि उलटयांमुळे होणारे निर्जलीकरण(डीहायड्रेशन) टाळण्यासाठी भरपूर पाणी किंवा ऊर्जा मिळेल असे पेय पिणे योग्य ठरते.
- पुरेशी विश्रांती घेतल्याने अंगदुखी किंवा थकवा यावर आराम मिळू शकतो.
2)मलेरिया
मलेरिया हा आजार संक्रमित असलेल्या ॲनोफिलीस डास चावल्याने प्रसार होणाऱ्या प्लास्मोडियम परजीवीमुळे होतो. डास चावल्यानंतर साधारण 10 ते 15 दिवसांनी लक्षणे दिसतात आणि त्यात खालील काही लक्षणांचा समावेश होतो:
- परजीवीद्वारे लाल रक्तपेशींची कमतरता झाल्याने अशक्तपणा आणि थकवा वाटणे.
- तीव्र थंडी वाजणे, घाम येणे आणि जास्त ताप येणे.
- सतत आणि तीव्र डोकेदुखी.
- थकवा जाणवणे आणि स्नायू दुखणे.
- जठर आणि आतयड्यांच्या समस्या उद्भवणे जसे की मळमळ, उलट्या आणि अतिसार.

मलेरियाचा उपचार
मलेरियावरील उपचार करण्यासाठी रोगाची तीव्रता, रुग्णाचे वय आणि इतर वैद्यकीय स्थिती यावर अवलंबून असतात:
- मलेरियाचे त्वरित निदान केल्याने कमी त्रास होत असतानाच तुम्ही बरे होऊ शकता पण जर निदान आणि उपचार प्रक्रिया योग्य वेळी सुरू झाली नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.
- मलेरिया पासून वाचण्यासाठी डासांपासून स्वतःचे संरक्षण करा त्यासाठी घरात आणि बाहेर प्रवासात सुद्धा डासांपासून सावध रहा.
- मलेरियासाठी लसीकरण देखील केले जाते योग्य वेळी लस घेणे लहान मुले व प्रौढांसाठी फायद्याचे ठरते.
3)झिका
झिका विषाणूचा प्रसार प्रामुख्याने एडिस ह्या डासांद्वारे होतो. झिका ची लागण झालेल्या बहुतेक लोकांमध्ये लगेच लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु जेव्हा लक्षणे दिसतात तेव्हा ते डास चावल्यानंतर 3 ते 14 दिवसांच्या आत दिसतात आणि त्यात पुढील लक्षणांचा समावेश होतो:
- स्नायू दुखणे आणि सौम्य डोकेदुखी होणे.
- सौम्य ताप येणे.
- पूर्ण अंगावर पुरळ येणे.
- हाताच्या आणि पायाच्या सांध्यांमध्ये वेदना होणे.
- खूप डोळे दुखणे आणि डोळे लाल होणे.
झिकाचा उपचार
झिका साठी कोणताही विशिष्ट विषाणूविरोधी (अँटीव्हायरल) उपचार नाहीत पण खबरदारीच्या उपचारांसाठी काही उपाय करता येऊ शकतात:
- झिका ह्या आजाराची लक्षणे जाणवताच त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी गरज पडल्यास रुग्णालयात दाखल व्हावे.
- पुरेशी विश्रांती घेऊन शरीराला आराम मिळू शकतो.
- निर्जलीकरण(डीहायड्रेशन) टाळण्यासाठी पाणी किंवा ऊर्जा मिळेल असे पेय प्या.
डेंग्यू, मलेरिया आणि झिका प्रतिबंध
या रोगांपासून बचाव करण्यासाठी डासांपासून स्वतःचे रक्षण करणे महत्वाचे आहे म्हणून येथे काही प्रतिबंधित उपाय देत आहोत:
- कीटकनाशकांचा आणि मच्छर प्रतिबंधके(मॉस्किटो रिपेलेंट्स) वापर करणे महत्वाचे आहे.
- संरक्षण होईल असे पूर्ण कपडे घालणे आणि पायात बूट घालणे फायद्याचे आहे.
- झोपताना मच्छरदाणी वापरा, दार आणि खिडक्यांना जाळी लावा.
- घरातील अडगळीचे सामान किंवा डासांना लपता येईल अश्या जागांची स्वच्छता करा.
- पाणी साठवण्याच्या टाक्या, भांडे स्वच्छ करा, ते थोडा वेळ कोरडे ठेवा, आणि सभोवताली पाणी साठून राहील अश्या वस्तु पडून असतील तर त्या लवकर काढून टाका.
- डास असतील अश्या ठिकाणी फिरणे टाळा.
- डास चावल्यानंतर थोडे जरी लक्षण दिसले तरी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या आणि उपचार सुरू करा नाहीतर खूप गंभीर परिणाम होऊ शकतात.
सारांश
डासांपासून होणाऱ्या प्रत्येक आजारापासून वाचण्यासाठी त्यांच्यापासून वाचणे आणि योग्य वेळेत वैद्यकीय मदत घेणे हेच सर्वोत्तम उपाय आहेत. त्यामुळे घरगुती उपाय करण्यात वेळ घालवण्यापेक्षा डॉक्टरकडे जा, गरज पडल्यास रुग्णालयात दाखल व्हा, आणि उपचार सुरू करा.
प्रश्नोत्तरे
डेंग्यूपासून बरे होण्यासाठी किती वेळ लागतो?
लक्षणे आणि त्यांची तीव्रता ह्यावर डेंग्यू मधून बरं होण्याचा कालावधी ठरतो पण साधारण 3 ते 12 दिवस लागू शकतात. परंतु त्या नंतर बरेच दिवस अशक्तपणा राहू शकतो. संतुलित आहार आणि योग्य वैद्यकीय उपचार यांच्या मदतीने लवकर बरे होण्यास मदत मिळू शकते.
डेंग्यू, मलेरिया आणि झिका या रोगांचे निदान कसे केले जाते?
रक्त चाचण्या करून या रोगांचे निदान केले जाते. जे विषाणू किंवा परजीवी रक्तात उपस्थिती असतात त्यानुसार आणि जी लक्षणे दिसतात त्यानुसार डेंग्यू, मलेरिया की झिका ते ओळखायला मदत होते. त्यावरून पुढील उपचार सुरू होतो.